अकोला : एसटी महामंडळाकडून अकोला विभागातील अकोला आगार क्रमांक १ अर्थात जुने बसस्थानकाला पाच नवीन बस गाड्या उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. अकोला आगारात बहुतांश गाड्या खिळखिळ्या झाल्या असून ग्रामीण भागातील अनेक फेऱ्या बसगाड्यांअभावी बंद करण्यात आल्या होत्या. नवीन बसगाड्यांच्या प्रस्तावाला महामंडळाने मान्यता मिळाल्यानंतर सोमवारी आगाराला ५ गाड्या उपलब्ध झाल्या आहेत. अकोला जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागांतील नागरिकांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी. बस सेवा हा प्रमुख प्रवासाचा पर्याय आहे. मात्र, सध्यस्थितीत या जिल्ह्यांमध्ये अत्यंत जुन्या व जीर्ण अवस्थेतील बसेस कार्यरत आहेत. परिणामी, प्रवाशांना प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, वारंवार बिघाड होण्याच्या कारणामुळे वाहतूक सेवा विस्कळीत होते. शासन स्तरावरून विविध आगारास नवीन अद्यावत बस गाड्याचा पुरवठा करण्याचे नियोजन आहे. वारंवार मागणी करुनही आगाराला बसेस उपलब्ध झाल्या नाहीत. अकोला आगार क्रमांक येथून आंतरराज्य गाड्या दररोज चालविल्या जातात त्यामध्ये अकोला आदिलाबाद, अकोला इंदूर, अकोला- छिंदवाडा, अकोला निजामाबाद असल्याने दरररोज ८ सुसज्ज गाड्यांची आवश्यकता असते. त्या व्यतिरिक्त अकोला नागपूर दररोज चार नियते चालविले जातात त्याकरिता ४ नवीन गाड्या लागतात. या लांबपल्याच्या चालणाऱ्या गाड्या व्यतिरिक्त दररोज १२ बसगाड्या अकोला परतवाडासाठी चालवल्या जातात आणि सोबत पातुर व बाळापूर तालुका येथील ग्रामीण भागातील दळणवळणाचा जास्तीत जास्त भार अकोला आगर क्रमांक १ वरच आहे. तालुक्यातील ग्रामीण आगातील प्रवासी व शालेय शिक्षणाकरिता विद्यार्थ्यांच्या हिताकरिता बसेस चालविल्या जातात.
अकोला आगार क्रमांक १ ला एसटी महामंडळाकडून पहिल्या टप्प्यात ५ नवीन बसगाड्या मिळाल्या असून या गाड्या आंतरराज्य फेऱ्या जसे इंदूर, छिंदवाडा, निजामाबाद, अदिलाबादसाठी चालविण्यात येणार आहेत. साध्या बसचेचआकारल्या जाणार असून बसमध्ये एकुण ४० आसन व्यवस्था आहे.
पंजाबराव बुंदे, आगार व्यवस्थापक
सध्यस्थितीत आगारातील उपलब्ध गाड्या कालबाह्य झाल्या आहेत. त्यांची अवस्था दयनीय असल्यामूमुळे प्रवाशांना दळणवळणाची सुविधा उपलब्ध करून देणे जोखमीचे आहे. याबाबत आगार व्यवस्थापकांनी लोकप्रतिनिधींकडे पत्राव्दारे १५ बसगाड्या शासनस्तरावरुन मिळणे बाबत विनंती केली होती. आगाराला पहिल्या टप्प्यास ५ गाड्या उपलब्ध झाल्याने प्रवासी वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदतीचे ठरणार आहे. सायंकाळी आगारात नवीन बसेसचे पुजन करण्यात आले. यावेळी आगार व्यवस्थापक पंजाबराव बुंदे, एसटीएस राखी खोटरे, एटीआय निलेश वानखडे, करुण शिरसाट, सचिन हाताळकर, मनीष लाहुलकर, पातालबंसी, शिवानंद तराळे, मनीष नागे, रवी तराळे, चव्हाण, एम.डी. वानखडे आदींची उपस्थिती होती.








